हवेली प्रतिनिधी :
पिंपरी सांडस, न्हावी सांडस व सांगवी सांडस या गावात वारंवार वीज पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होत होत्या , लाईन फॉल्ट आणि ट्रान्सफॉर्मर बिघाडाच्या समस्यांना सामोरे जात असतानाही महावितरणचा वायरमन/लाईनमन श्री. तायडे सातत्याने गैरहजर राहत असल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकरीवर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाईट बंद पडल्यावर किंवा कोणताही लाईन संबंधित तांत्रिक प्रश्न उद्भवल्यावर संबंधित कर्मचारी कामावर उपस्थित राहत नव्हता उलट ग्रामस्थांना टाळाटाळीची उत्तरे देऊन पोलीस तक्रारीची धमकी दिली जात होती.
या बाबत शिवसेनेच्या वतीने महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैंकर यांच्याकडे तक्रारी अर्ज देत सध्याचा लाईनमन हटवून तत्काळ नवीन, जबाबदार वायरमन/लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.
तक्रारी अर्ज देताना शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, पुणे जिल्हा समन्व्यक ऍड. गणेश म्हस्के, सांगवी सांडस गावचे सरपंच भाऊसाहेब शिंदे, संजय लोले,मोतीराम लकडे, संदीप कंबिलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत लाईनमनची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
