पुणे: चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मंगेश ऊर्फ झंब्या तुकाराम कसबे याला पुणे सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह नियमित जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश कविता डी. शिरभाते यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणात पीडित मुलगी १६ वर्षांची असून आरोपी २१ वर्षांचा आहे. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. फिर्यादीनुसार, आरोपीने पीडितेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गरोदर राहिली होती. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६४(m) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत गुन्हा (क्र. १६८/२०२५) दाखल करण्यात आला होता. आरोपी १६ एप्रिल २०२५ पासून कारागृहात होता.
आरोपीच्या वतीने ॲड गणेश म्हस्के पाटील यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, फिर्याद नोंदवण्यास दोन महिन्यांचा उशीर झाला आहे. तसेच पोलीस तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे वय आणि पीडितेचे वय लक्षात घेता, तसेच तपासाची सद्यस्थिती पाहता जामीन मिळावा अशी विनंती करण्यात आली.
सरकारी वकिलांनी जामिनास तीव्र विरोध केला. आरोपी आणि पीडिता एकाच भागात राहत असल्याने पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.
मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून नमूद केले की, तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पीडितेच्या संमतीचा प्रश्न खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट होईल. “जामीन हा नियम आणि कारावास हा अपवाद आहे” हे तत्व ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड गणेश म्हस्के पाटील व ॲड गुलनाझ पठाण यांनी काम पाहिले.
