हवेली प्रतिनिधी :
तालुक्यातील सांगवी सांडस गावात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडचणी, लाईन फॉल्ट आणि ट्रान्सफॉर्मर बिघाडाच्या समस्यांना सामोरे जात असतानाही महावितरणचा वायरमन/लाईनमन श्री. तायडे सातत्याने गैरहजर राहत असल्याने गावातील नागरिक आणि शेतकरीवर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाईट बंद पडल्यावर किंवा कोणताही लाईन संबंधित तांत्रिक प्रश्न उद्भवल्यावर संबंधित कर्मचारी कामावर उपस्थित राहत नाहीत, उलट ग्रामस्थांना टाळाटाळीची उत्तरे देतात आणि पोलीस तक्रारीची धमकी देतात.
लोणीकंद सबस्टेशनपासून सांगवी सांडस हे गाव २५-३० किलोमीटर अंतरावर असल्याने, तांत्रिक बिघाडाच्या वेळी त्वरीत सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र, वायरमनची अनुपस्थिती व असहकारामुळे गावात लाईटपुरवठा खंडित राहतो, परिणामी शेतकऱ्यांचे सिंचनाचे नुकसान होते आणि नागरिक अंधारात राहत आहेत.
गावातील नागरिकांनी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैंकर यांना निवेदन देत मागणी केली आहे की, सध्याचे कर्मचारी हटवून तत्काळ नवीन, जबाबदार वायरमन/लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक गणेश म्हस्के, सांगवी सांडस गावाचे सरपंच भाऊसाहेब शिंदे, चेअरमन संजय लोले, मोतीराम लकडे, संदीप कंबिलकर आदी उपस्थित होते.
