मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना माफिया म्हणणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. 26 नोव्हेंबरला जो अतिरेकी हल्ला मुंबईवर झाला होता. कशाला आपण ते स्मृतीदिन साजरे करायचे. ओंबळे गेले करकरे, कामटे गेले. ज्यावेळी अतिरेकी घुसले होते तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करत त्यांच्या सोबत पोलीस लढत होते. त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची ठाकरी भाषेत चांगलीच ठासली.
इथे नांगरे पाटिल आहेत. असे एक नाही अनेक पोलीस आहेत. एक गोळी त्यांच्या हृदयाचा किंवा छातीचा छेद घेऊ शकली असती, मात्र त्यांनी पर्वा केली नाही. जसा सैनिक तिथे सीमेवर लढतो त्याच हिमतीने, त्याच जिद्दीने लढणारे हे माझ्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. पण अतिरेक्यां बरोबर लढणारे हे पोलीस केवळ तुम्हाला बोंबाबोंब करायला चालतात. होळीला वेळ आहे अजून. तुमचा २४ तास शिमगा असेल तर मी काही करु शकत नाही. आमच्याकडे सणवार असतात. कधी गणपती असतात, कधी नवरात्र असते, कधी दिवाळी असते. पण काहींच्या घरी कायम शिमगा असतो. मग शिमगा करायला जाता म्हणून तुम्हाला अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया मग त्या अखिलेश यादवला त्यांच्या घराजवळ अडवलं, प्रियांकाना अडवलं, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं. अखिलेश यादवच्या घरी फक्त रणगाडे आणणं शिल्लक होतं. सगळा पोलीस बंदोबस्त लावला होता. मग जर माझे महाराष्ट्राचे पोलीस माफिया आहेत मग उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारत भूषण, भारतरत्न आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.