ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅली ची मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून जल्लोषात सुरवात

मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २ ते १२ जानेवारी या कालावधीत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक क्रीडा ज्योतचा प्रारंभ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून शुक्रवारी सकाळी झाला. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या जनजागृतीसाठी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा ज्योत रॅलीचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून श्री. पांढरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा ज्योत रॅली बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जवळील सेल्फी पॉइंट पर्यंत काढण्यात आली. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ कल्याण पांढरे यांनी आज येथे केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी सदर रॅली बद्दल प्रस्तावना व माहिती सांगितली.


महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व जळगाव येथे ३९ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बास्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील भाऊराव वीर, सुमीत पाटील, भारती देवीकर आदींची उपस्थिती होती, तशेच क्रीडा क्षेत्रातील उदय देशपांडे, प्रदीप गंधे, संजय शेटे, सचिव गोविंद मथ्युकुमार, भास्कर करकेरा, उमेश मुरकर या मान्यवरांची उपस्थिती होती.
रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, जिन्मॅस्टिक, तायक्वांदो, सॉफ्ट टेनिस, मलखांब, फेन्सिंग, बॉक्सिंग, थ्रो बॉल, शूटिंग, किक बॉक्सिंग, कराटे या क्रीडा प्रकारातील खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, क्रीडा अधिकारी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com