भारतीय सेनेने १७२ जणांच्या जीवावर आलेल संकट दूर केलं

एकीकडे देश मकर संक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं त्यासोबत तिकडे काम करणाऱ्या तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला.
हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. परिस्थितीचं गांभीर्य आणि तब्बल १७२ लोकांच्या जीवाची जबाबदारी ओळखून मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने तात्काळ भारतीय सेनेशी संपर्क साधला. समोर आलेल्या प्रसंगाची व्याप्ती लक्षात घेऊन भारतीय सेनेने तात्काळ प्रशिक्षित सैनिकांची एक तुकडी रवाना केली. त्या भीषण परिस्थितीत संपूर्ण बर्फातून आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी रात्रीच्या अंधारात त्या १७२ लोकांना बर्फातून शोधून काढलं. त्यांना शांत करून भारतीय सेना आपल्या ‘सेवा परमो धर्म:’ या आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही, असं सांगून आश्वस्त केलं.
१५ जानेवारीचा सूर्य उगवताच भारतीय सेनेच्या आसाम रायफल्स रेजिमेंटने त्या अडकलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर मिशन हाती घेतलं. अश्या वातावरणाची सवय असलेले प्रशिक्षित स्पेशल कमांडो, हत्यारे आणि प्रशिक्षित कुत्रे त्यांनी या मिशनसाठी रवाना केले. त्याशिवाय यात अडकलेल्या लोकांच्या तब्यतेची काळजी घेण्यासाठी मेडिकल टीम ही पाठवण्यात आली.
भारतीय सेनेने एकाही कामगाराला इजा न होऊ देता तब्बल १७२ कामगारांची त्या भीषण परिस्थितीतून सुखरूप सुटका केली. एकीकडे देश जिकडे संक्रातीचा सण साजरा करत होता तिकडे दुसरीकडे भारतीय सेनेने १७२ जणांच्या जीवावर आलेल संकट दूर केलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com