मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक ‘भरीव’ तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. ४५ हजार ९४९ कोटींचा हा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा अर्थसंकल्पात १७.७० टक्क्यांची वाढ केली आहे. महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही वाढ करण्यात आल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
यावेळी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने अर्थसंकल्प सादर केला असून, विकास कामांसाठी सुमारे २२ हजार ६४९ कोटी ७३ लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच आरोग्य खात्यासाठी अंदाजे २ हजार ६६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
त्याशिवाय बेस्टच्या उपक्रमासाठी ८०० कोटी आणि कोस्टल रोड उपक्रमासाठी ३ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात अाली आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही थेट करवाढ केलेली नाही. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे दोनशे आरोग्य केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेने शिक्षण विभागासाठी ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये डिजीटल शिक्षणासाठी २७ कोटींची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी शाळेत बोलक्या संरक्षक भिंती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना हरभरे, मसूरडाळ आणि तांदूळही देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी उपस्थिती भत्ता आणि सर्व विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास मिळावा म्हणूनही या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. आहे त्या योजना सुरू ठेवण्यावर आणि शालेय प्रकल्प मार्गी लावण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी केली सडकून टीका

या अर्थसंकल्पावर मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘हा कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प…’ असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना शासित मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे बोगस बजेट आहे. गेल्या वर्षभरात ४०% इतकाही भांडवली खर्च महापालिकेने केला नाही आणि १०० टक्के खर्च केला तो पण कोस्टल रोडचा. तो खर्च केला कारण कॅगने ताशेरे ओढले. विनाकारण पेमेंट केल्याचे म्हटले म्हणूनच तो खर्च झाला, असा आरोप आमदार अरुण भातखळकरांनी केला आहे. तर आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणार असे सांगून मराठी शाळा विकण्याचा घाट महापालिकेने घातला आहे, असेही ते म्हणाले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर वाढवला नाही असे सांगितले जात असले तरी आमचा दबाव असताना तुम्ही कर वाढवूच शकत नव्हतात, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. उलट कोविड परिस्थिती लक्षात घेता कर कमी करण्याची आवश्यकता होती जे महापालिकेने केले नाही असा हल्लाबोल अतुल भातखळकरांनी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकराला जो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि कॉन्ट्रॅक्टर्सना मदत करणारा, भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे असे भातखळकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com