काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कोरोना मुळे निधन

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे एकनाथ गायकवाड हे वडील होते. माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी १० वाजता उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले होते. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.
एकनाथ गायकवाड यांचा आतापर्यंत राजकीय प्रवास – १९८५-१९९०: महाराष्ट्र विधानसभा सदस्य, १९९०-१९९५: महाराष्ट्र विधानसभा सदस्य, १९९९-२००४: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, १९९९-२००४: महाराष्ट्र आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय राज्यमंत्री, २००४-२००९: खासदार, लोकसभा, २००९ -२०१४ :: लोकसभा सदस्य , २०१७-२०२०: मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com