मुंबई : मुंबई शहराचे कायदा व सुव्यवस्था पाहणारे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी झोन ४ मधील सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी शिवडी पूर्व विभागात विशेष करून रात्रीच्या वेळेस नागरिकांना विशेषतः महिला व लहान मुलांना अंधाराचा सामना करावा लागतो ही बाब त्यांच्या समोर मांडली व याबाबत बी. पी. टी. प्रशासनाकडे पाठपुरावा करून शिवडी पूर्व पट्टयात सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवा बत्तीची मुबलक व्यवस्था करायला सांगावे, ही विनंती केली. पोलीस सहआयुक्तांनी देखील यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत बी. पी. टी. प्रशासना सोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी झोन ४ मधील सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्वच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी चांगली कामगिरी बजावणाऱ्या महिला व पुरुष पोलीस अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
