भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये ब्राँझ पदकाची कमाई करतानाच नवा इतिहास रचला आहे. सलग दोन ऑलिंपिकमध्ये मेडल मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक मध्ये रजत पदकाची कमाई केली होती. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिने चीनच्या बिंग जियाओ वर २१-१३,२१-१५ असा दोन सेटमध्ये सरळ विजय मिळविला. सिंधूचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. तिने रिओ ऑलिम्पिक मधून डेब्यू केला होता.
सिंधूचे वडील रामण्णा यांनी सिंधूच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सिंधूच्या विजयाचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, उपांत्य फेरीत तैवानच्या ताय जु किंग कडून सिंधूला पराभव पत्करावा लागला तेव्हा तिला साहजिकच वाईट वाटले. त्यावेळी मी तिच्याशी बोललो आणि म्हणालो,’ पुढच्या सामन्यावर सर्व लक्ष केंद्रित कर. कांस्य पदकासाठी हा सामना होणार आहे. तू मला एक गिफ्ट देत आहेस असा विचार करून खेळ.’ सिंधूच्या विजयाचा आनंद आहे त्याचबरोबर तिचे प्रशिक्षक यांचाही या यशात मोठा वाटा आहे असे रामण्णा म्हणाले.