मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ, दिलासादायक बातमी !

मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज होणारी वाढ हजारांवरून आता दर दिवशी लाखाच्या घरात पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी ही वाढ देशातील आरोग्य यंत्रणांपुढे असणारे आव्हान आणखीनच बिकट करताना दिसत आहे. पण या संकटाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभागासह झटणारी पोलीस यंत्रणा या साऱ्यांच्या अथक परिश्रमांतून कोरोनाचे हे सावटही टळण्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रातही सध्याच्या घडीला कोरोनाबाधित बरे होण्याचा आकडा सुधारत असताना मुंबईतही सलग अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शहरात 8090 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. तर, 7410 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यावेळी रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा 50 दिवस एवढा होता.
पालिका प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 7221 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर तब्बल 9541 कोरोनाबाधितांनी यशस्वीरित्या मात केली. ज्यामुळे आता एकूण कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्णवाढ दुप्पटीचा दर 52 दिवसांवर पोहोचला आहे. कोरोाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास हे शहर पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणात आणण्यास यशस्वी ठरेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com