इजिप्त राष्ट्राध्यक्ष सीसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी, भारतीय ‘तेजस’ वर खुश,

भारताच्या २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल- सीसी यांना आमंत्रण दिले गेले आहे. सीसी २०१४ पासून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यातून अरब जगतावर भारताची भूमिका काय याचे संकेत दिले गेल्याचे मानले जात आहे. तसेच इजिप्त- भारत सैन्य संबंध वाढीची एक संधी या दृष्टीने सुद्धा याला महत्व दिले जात आहे.

इजिप्तला भारतीय बनावटीची तेजस ही लढाऊ विमाने हवी असून अशी ७० विमाने खरेदी करण्यास इजिप्तने उत्सुकता दाखविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबर रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इजिप्त दौऱ्यात कैरो येथे राष्ट्रपती सीसी यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी २० शिखर संमेलनात आमंत्रित ९ देशात इजिप्तचा समावेश आहे.

२०२१ आणि २०२२ मध्ये करोना मुळे प्रजासत्ताक दिनाला मुख्य पाहुणे नव्हते. त्यापूर्वी २०२० मध्ये ब्राझीलचे जेअर बोल्सेनारो हेच शेवटचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. गेली दोन वर्षे इजिप्त आणि भारत संयुक्त हवाई सराव करत आहेत. भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांमध्ये इजिप्तने रस दाखविला आहे. इजिप्तचे वायुसेना प्रमुख महमूद फआद अल गवाद यांनी जुलै मध्ये या संदर्भात भारत दौरा केला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन्ही देशांनी पहिला संयुक्त हवाई सराव केला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com