मुंबई : काळाचौकी जिजामाता नगर मधील संक्रमण शिबिर येथे आपल्या खेळाच्या मैदानावर होणाऱ्या बांधकामाबद्दल आपलं हक्काचं मैदान वाचवण्यासाठी २२ जानेवारी २०२२ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस प्रतिक नांदगावकर, नवनाथ क्रिडा मंडळाचे अध्यक्ष महेश पावसकर, हर्षद खोत, किशोर भोर, संदीप मेंगडे, मंगेश घेगडे, सुशील साळसकर आदी उपस्थित होते.
१७ जानेवारी रोजी म्हाडाने प्राथमिक काम करण्यासाठी विभागातील जनतेला कोणतीही पूर्वसुचना न देता जेसीबी पाठवला होता. मैदान वाचवण्यासाठी आणि ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी विभागीय जनतेकडून तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला. नागरिकांचा रोष पाहून म्हाडाच्या अधिकार्यांना जेसीबी माघारी फिरवावा लागला. पूर्वी ह्याच जागेवर संक्रमण शिबिर होते. काही वर्षांपूर्वी म्हाडाने असुरक्षित ठरवून ते पाडले. ह्याच जिजामाता नगरच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर येथील शंभर पेक्षा जास्त कुटुंबं विभागा बाहेर फेकली गेली आहेत. त्यांना इथे संक्रमण शिबिर बांधून द्यावं, ही नागरिकांची मागणी आहे.
त्यावेळी म्हाडा अधिकारी प्रशांत धात्रक (एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर), सचिन गुजराती (असिस्टंट इंजिनिअर) यांनी म्हाडा कार्यालयात ह्या विषयावर लवकरच बैठक घेण्याचं मान्य केलं होतं. पण आजवर बैठकीसाठी तारीख वेळ दिलेली नाही.