मुलांना पेपर लिहायला जास्त वेळ मिळणार, १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – वर्षा गायकवाड

दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय. या वर्षात मुलांचा लेखन सराव कमी झाल्याने मुलांना पेपर लिहीण्यासाठी जास्त वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी पेपर सकाळी १०:३० वाजता सुरू होईल.

कधी होणार परीक्षा?
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांनी प्रेक्टिकल परीक्षा होईल.
२२ मे ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देण्यात येईल. त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येतील. शिवाय या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. तर या परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचे हॉलतिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
पेपर लिहायला जास्त वेळ देणार. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नाही. हे लक्षात घेत पेपर लिहीण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. यानुसार ४० ते ५० मार्काच्या पेपरसाठी १५ मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी 1 तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल. पास होण्यासाठीच्या ३५ मार्काच्या पातळीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेच वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com