माहीमच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळच दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी काल केला. सकाळी लगेचच कारवाई !

मुंबई : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्हिडीओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील माहिमच्या (Mumbai Mahim) समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावरून पु्न्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मागील मविआ सरकारने भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या १७ हजार मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे, अशी विचारणा एकाला केली. त्यानंतर त्याने ड्रोन फूटेज पाठवले. त्यात हे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले. हे अनधिकृत बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

काय झाली कारवाई?
माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. त्याबाबतची चित्रफितही दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी. हे बांधकाम तोडले नाही तर आम्ही तेथे सर्वात मोठे गणपतीचे मंदिर उभे करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com