राज्यभरातील परिचारिकांचे आजपासून काम बंद आंदोलनसरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

मुंबई – खासगीकरणाच्या निषेधार्थ आणि इतर मागण्यांसाठी परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे ते २५ मे दरम्यान राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बाह्य स्त्रोत (कंत्राटी) द्वारे पदे भरण्यास तीव्र विरोध केला आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे २६ आणि २७ मे रोजी परिचारिका संपावर गेल्या आहेत.

त्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, आजपासून परिचारिकांनी संप सुरू केला आहे.

२३ मेपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी दिसून आला. २३ मे ते २५ मे पर्यंत परिचारिकांनी तासभर आंदोलन केले, मात्र आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचारिकांनी आता पुन्हा संप पुकारल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी आपल्या मागण्या सरकारी दरबारात वारंवार मांडल्या. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्याने संतप्त परिचारिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

२३ ते २५ मे दरम्यान परिचारिकांकडून शांततापूर्ण आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली आहेत. याची दखल न घेतल्यामुळे २६ ते २७ मे २०२२ पर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने चर्चेसाठी वेळ दिला नसून संपूर्ण राज्यात २८ मे २०२२ पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.

आजपासून सुरू झालेल्या संपात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या रुग्णालयातील सर्व शाखांमधील परिचारिका सहभागी होणार आहेत. याला संपूर्ण प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com