मुंबई : जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेना आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर आपल्या क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतात. पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ जून (रविवारी) रोजी आरे चेक नाका येथील दोन उद्यानांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन वायकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्यानांमध्ये यावेळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.
रविंद्र वायकर यांनी मुंबईचे फुप्फुस अशी ओळख असलेल्या गोरेगाव (पूर्व) येथील आरे चेक नाक्याजवळ शहीद तुकाराम ओंबळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ आमदार निधीतून दोन भव्य मनोरंजन उद्याने उभारली. मुंबईच्या विविध भागांतील जनता या दोन्ही उद्यानांमध्ये येत होती. परंतु गेली काही वर्ष काही कारणांमुळे ही दोन्ही उद्याने आरे प्रशासनाने बंद ठेवली आहेत.
शासनाने या उद्यानांच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च केले असून ती बंद न ठेवता नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, असे पत्र वायकर यांनी आरे प्रशासनाला दिले होते. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आरेतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या उद्यानांबाबत चर्चा करुन, ती जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.