मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक २०६ मधील एकात्मता फुले वसाहत व हनुमान नगर तसेच प्रभाग क्रमांक २०२ मधील सेना नगर येथील वरळी-शिवडी लिंक रोड कामकाज बाधित रहिवाशांचा भक्ती पार्क, वडाळा या ठिकाणी स्थलांतर करण्यास विरोध आहे, अशी भूमिका या रहिवाशांनी लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मांडली आहे. तसेच शिवडीतील स्थानिक व्यापाऱ्यांचा देखील दुकानाच्या जवळ दोन्ही बाजूला पिलर टाकण्यासाठी विरोध आहे, हे देखील आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने “वरळी-शिवडी लिंक रोडचे कामकाज तसेच बाधित रहिवाशांचे पुनर्वसन” या विषयांवर एम. एम. आर. डी. ए. च्या मुख्य कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
संबंधित विषयांवर चर्चा होऊन शेवटी आदित्य ठाकरे यांनी एम. एम. आर. डी. ए. ला महत्वाच्या सूचना केल्या. शिवडी मधील एकाही प्रकल्पबाधित झोपडीधारकाचे पुनर्वसन भक्ति पार्क येथे करू नये. शक्यतो चांगल्या सुविधा असलेल्या कांजुरमार्ग येथील इमारती मध्येच करावे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मागणी प्रमाणे दोन्ही बाजूला दुकानाच्या जवळ रँपचे पिलर न बनविता रस्त्याच्या मध्यभागी एकाच पिलरवर रँप बनविण्यात येईल असे बदल पुलाच्या रेखाचित्रामध्ये करावेत.
सदर बैठकीला शिवडी विधानसभा आमदार अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनील शिंदे, बेस्ट चेअरमन आशीष चेंबूरकर तसेच एम. एम. आर. डी. ए. आयुक्त आय. ए. एस. श्रीनिवासन, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त्त आयुक्त आय. ए. एस. वेल्लरसु, सहायुक्त रमेश पवार, माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक सचिन पडवळ, समाधान सरवणकर आणि नगरसेविका उर्मिला पांचाळ उपस्थित होते.