संपूर्ण देश कोरोना महामारी च्या संकटातून सावरत असताना अनेक राज्यात विविध समस्यांनी डोकं वर काढले असून महाराष्ट्रात आरोग्य सेवेत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शासकीय रूग्णालयांत गरजू पेशंटना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या समस्येची जाणीव होताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करत असतानाच आपल्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना “रक्तदान शिबीर ” च्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्याचे आवाहन केले. पक्षप्रमुखांचा आदेश येताच दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी आज्ञा शिरसावंद्य मानत रक्तदान उपक्रमाची सुरुवात आपल्या विभागातून म्हणजेच दक्षिण मुंबईतून केली.


विभाग प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळात आपल्या विभागातील जनतेसाठी अहोरात्र झगडत विविध उपक्रमांद्वारे जनतेची मदत करणाऱ्या आपल्या विभागप्रमुखाने रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर शिवसैनिकच काय तर विभागातील इतर तरुणही ही रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले आणि रविवार सुट्टीचा दिवस यानिमित्ताने तरी कारणी लागेल या भावनेतून रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हा उपक्रम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी आठवडाभर अगोदर शाखा शाखांमधून सभा घेतल्या. पदाधिकारी व शिवसैनिकांना या उपक्रमाची ची आवश्यकता पटवून देत सुयोग्य असे नियोजन करून मार्गदर्शन केले .आणि याच मुळे रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजीचा दक्षिण मुंबई विभागातील कुलाबा -मच्छीमार नगर, हुतात्मा चौक परिसर- आर्यसमाज खेतवाडी -आश्रय संस्था व कामाठीपुरा – पद्मशाली समाज हॉल अशा चार ठिकाणी आयोजित रक्तदान उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

हा उपक्रम यशस्वी होण्यामागे विभाग प्रमुखांच्या चोख नियोजना बरोबरच पुरुष व महिला उपविभाग प्रमुख, समन्वयक , संघटक ,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवा सेना शाखा अधिकारी, उपविभाग अधिकारी , इतर पदाधिकारी , कार्यकर्ते , आजी-माजी सेना पदाधिकारी त्याचप्रमाणे विभागातील शिवसैनिक यांचे फार मोठे योगदान लाभले. अशा या स्तुत्य उपक्रमास शिवसेनापक्ष सचिव , खासदार माननीय अनिल देसाई साहेब त्याचप्रमाणे खासदार माननीय अरविंद सावंत साहेब यांनी आवर्जून भेट देत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.