राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.

मुंबई : ‘अपमान झाला छत्रपतींचा विसरून जाऊ सन्मान आम्ही कुलपतींचा’
‘महामानवी महामानवांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’
‘कुलपती Go Back’
‘शिवराय केवढे? आभाळा एवढे!’
अशा घोषणांनी मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसचा परिसर आज दणाणून गेला. महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांकडून महामानवी आणि महामानवांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आज संताप व्यक्त केला.
वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. याबद्दल महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. या संतापाला जागा करून देण्यासाठी छात्र भारतीच्या वतीने आज क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मृतिदिनी मुंबई विद्यापीठ परिसरात सविनय मार्गाने निदर्शने करण्यात आली होती.
‘आज विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. उद्या कामगार रस्त्यावर येतील. निषेध करतील. राज्यभर सगळ्या विद्यापीठ, कॉलेजेसमध्ये या विधानांचा निषेध केला जाईल. राज्यपाल भवनावरही मोठा मोर्चा काढू. राज्यपालांना हटवल्याशिवाय आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही.’ अशा शब्दात छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
या निदर्शनाला मुंबई ग्रॅज्युएट फोरमचे जालिंदर सरोदे, शिक्षक भारतीच्या राधिका महांकाळ, ज्युनिअर कॉलेज युनिटचे शरद गिरमकर, राष्ट्र सेवा दलाचे चंद्रकांत म्हात्रे, एआयएसएफचे अमीर काझी, पीएसयूच्या साम्या कोरडे, लोकशाही युवा संघटना, सत्यशोधक युवा संघटना आणि छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह विद्यार्थी, विचारवंत, कार्यकर्ते आणि प्राध्यापक उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com