मुंबई : मुंबई: एकता कल्चरल अकादमी या संस्थेने जाहीर केलेला समाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा समाजसेवेचा पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार, सहकार शिक्षण संस्था संचालित सहकार रात्र शाळा व महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री. गजानन लक्ष्मण रेवडेकर यांना एकता महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष व काठिनं घोंगडं फेम नाट्य-सिने अभिनेते श्री. नागेश मोरवेकर आणि स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक डाॅ. रमेश यादव यांच्या शुभहस्ते मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष श्री. प्रकाश जाधव, कोंकण सुपुत्र कवी अजय कांडर, रंग माझा वेगळा या मालिकेची अभिनेत्री अनघा भगरे आणि नाट्य-सिने अभिनेते प्रमोद पवार, सदानंद राणे, उज्जय आंबेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री. रेवडेकर हे वैश्यवाणी प्रतिष्ठानचे सरचिटणीस, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे संचालक, हरिओम् ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, पारशीवाडी मित्र मंडळाचे सल्लागार, श्रीलक्ष्मी नारायण मंदिर परिसर भाडेकरू संघाचे अध्यक्ष म्हणून दक्षिण मुंबईत कार्यरत आहेत. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे माजी मंडळप्रमुख असून त्यांनी या मंडळात अनेक खात्यांवर कामे कली आहेत. या मंडळातील अनेक विक्रम त्यांच्या कार्यपध्दतीवर आहेत. समाजाला नेहमी नवनीत देणार्या या व्यक्तीचा महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती केली. बीएस्ईएस् (अदाणी ईलेक्ट्रिसिटी) आस्थापनात स्थानीय लोकाधिकार समिती स्थापनेत सहभाग घेतला होता. याच अास्थापनातून रिकव्हरी खात्यातून वरिष्ठ पर्यवेक्षक यापदावरुन ३८ वर्षे सेवा करु ते निवृत्त झाले. याच आस्थापनातील श्री. गजानन रेवडेकर हे पहिले गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार होत.
यापूर्वी त्यांनी आदर्श नागरिक पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, अष्टगंध पुरस्कार, उत्कृष्ट कामगार पुरस्कार, राज्यस्तरीय सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार, वैश्य भूषण पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघ व सुवर्ण महोत्सवी मुंबई दूरदर्शन मंतरलेले दिवस सन्मान इ. पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
ते स्वतः उत्कृष्ठ सुत्रसंचालक आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व कला-क्रीडा उपक्रमांचे नियोजन त्यांनी केले आहे.
पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्मृती पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल आपणास काय वाटते असे पत्रकारांनी रेवडेकर यांना विचारले असता ते म्हणाले ज्या आईने हालअपेष्टा भोगून समाजाप्रती आदर्श ठेऊन जे कार्य केले, भारत सरकारने त्यांना “पद्मश्री” पुरस्कारांने गौरविले, त्या आईच्या सहवासात गणरायाच्या कृपेने एक दिवस त्यांच्या पुरंदर येथील ममता बाल सदनात जाण्याचा योग आला. अनाथांच्या माईंना आईच्या स्वरुपात पाहिले, त्यांचे ते देदीप्यमान कार्य पाहून मी भारावून गेलो. आज त्यांना जाऊन एक वर्ष झाले, तसेच सन २०२३ साल हे माईंचे “अमृत महोत्सवी जन्मदिन सांगता वर्ष” आहे आणि त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ठेवण्यात आलेला एकता कल्चरल अकादमीचा समाजसेवेचा पुरस्कार मला मिळत आहे ही माझी पूर्व पुण्याई व माझ्यावर बंधूवत प्रेम करणार्या मित्रांचे भाग्य होय असे मी मानतो. हा महिना जानेवारी आहे आणि साल २३ आहे. ज्यांच्या विचारांने मी प्रेरित झालो ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ तारखेला याच मिहिन्यात, माझे वडील लक्ष्मण सखाराम रेवडेकर व माझी मेहुणी सविता मिलिंद नारकर-नार्वेकर या द्वहींचे २३ वे स्मृतिवर्ष म्हणून मी हा समाजसेवेचा पुरस्कार या “त्रिमुर्ती” चरणी अर्पण करतो.
एकता महोत्सव आनंदकल्लोळात सादर झाला. प्रास्ताविक अध्यक्ष श्री. प्रकाश जाधव यांनी केले, आभार सचिव श्री. प्रकाश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारी संपादक प्रा. अवधूत भिसे यांनी केले.