मुंबई पोलीस आयुक्तांनी चक्क फेसबुकवर शेअर केला आपला मोबाइल नंबर

मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. याआधी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे यांच्याकडे होती. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हेमंत नगराळे यांची बदली करून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांचे प्रमुखपद संजय पांडे यांनी भूषवले होते. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यामुळे नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी नियुक्तीनंतर लगेचच मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या संजय पांडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मुंबईकरांचे आभार मानत थेट संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुकवर चक्क स्वतःचा मोबाइल नंबर शेअर केला आहे.

फेसबुक पोस्ट लिहून पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत, असे म्हटले आहे. मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे.

जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे! या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला ९८६९७०२७४७ या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल!

दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत. धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा!, असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com