मीराबाई चानूने आणखी एक पदक जिंकलं आहे.. आणि यावेळी “कृतज्ञतेचं सुवर्णपदक!”

हे पदक ‘वेटलिफ्टिंग’ मधलं नाही.. तर ‘कृतज्ञता’ या दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या प्रवृत्तीमधलं आहे.
इंफाळपासून 30 किमी अंतरावर एका दुर्गम खेड्यात राहणाऱ्या मीराला दररोज ट्रेनिंगसाठी इंफाळला यायला लागत असे. बस सेवा सोयीची नव्हती आणि परवडणारीही नव्हती. या मार्गावरुन अनेक ट्रक ‘वाळू’ ची वाहतूक करत असत. मीरा या ट्रकवाल्यांकडून ‘लिफ्ट’ घेऊन इंफाळला ये-जा करत असे. टोकियोमधे रजतपदक जिंकून गावी परत आलेल्या मीरानं या ट्रकवाल्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं. अशा तब्बल 150 ट्रकवाल्यांना बोलावून तिनं ‘जेवण’ दिलं आणि प्रत्येकाला एकेक ‘शर्ट’ भेट दिला. किती हृदयस्पर्शी घटना आहे ही ! वाचून डोळ्यात पाणी आलं. या उदात्त कृतीसाठी मीराबाईला लाखो भारतीयांनी मनोमन हे ‘कृतज्ञतेतलं सुवर्णपदक’ बहाल केलं आहे.

एकंदरीत हे सगळंच खूप सुखावणारं आणि आनंददायी आहे. ‘सरपणासाठी लाकूड तोडून आणणारी युवती’ ऑलिंपिकमधे पदक मिळवते, मणिपूरचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून तिला सन्मानानं ‘Additional SP ‘ च्या खुर्चीवर स्थानापन्न करतात, मग ही मुलगी आपल्या ‘वेटलिफ्टिंग’ला ‘लिफ्ट’ देणाऱ्या ट्रकचालकांचा सत्कार करते.. सगळंच कौतुकास्पद!

आणि एक गोष्ट जाणवली. त्या दुर्गम डोंगरी प्रदेशात, अनेक ड्रायव्हर्सनी या तरुण मुलीला वारंवार लिफ्ट दिली.. पण तिला एकही ‘कटू’ अनुभव आला नाही.. चांगुलपणावरचा विश्वास वाढवणारा हा अनुभव आहे.

मीराबाईला पुनश्च एकदा सलाम! .

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com