आशिर्वादच्या वक्तृत्वविकास व संभाषण चातुर्य प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद

मुंबई : “वक्तृत्वकला ही व्यक्तीला स्वतंत्र ओळख देते. केवळ वक्ता होण्यासाठीच ही कार्यशाळा नसून क्षेत्र आणि व्यवसाय कुठलाही असो; मनातले म्हणणे चारचौघात मांडण्यासाठी सभाधीटपणा लागतो, मुद्देसुद विचार व्यक्त करावा लागतो, गृहपाठ करून टिपण करावे लागते. उत्तम वक्तृत्व आपोआपच आपल्या चिंतनाला योग्य मार्ग देते. आपण समाजसेवक, राजकारणी, डॉक्टर, वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, समुपदेशक, अभियंता, विद्यार्थी वा इतर कुणीही असा वक्तृत्व आपल्या अभ्यासाला एक नवे आकाश देते. मनन, चिंतन व्यक्तीला वैचारिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करतात. एखाद्या विषयावर प्रश्नावर जो आपल्या वाणीतून प्रकट होतो, तो वक्ता. तसेच किती, कुठे आणि काय बोलावं आणि कुठे थांबावं हे जो जाणतो, तो सर्वोत्तम वक्ता.” प्रा. हेमंत सुधाकर सामंत बोलत होते आणि त्यांच्या शब्दांनी सभागृहात उपस्थित सर्व भारावले होते आणि त्याचे निमित्त होते ‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ आयोजित मोफत वक्तृत्वविकास व संभाषण चातुर्य प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळा. मुंबईच्या घाईगडबडीच्या दिनक्रमात आज स्वतःसाठी खास वेळ काढणं सगळ्यांनाच जमत नाही. पण आयुष्यात काही करायची जिद्द जे बाळगून असतात ते स्वतःला कितीही त्रास सहन करावा लागला तरीही वेळेचं गणित जुळवून आणतात. हेच आजच्या कार्यशाळेच्या निमित्ताने अधिक ठळक झाले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर अशा चार जिल्ह्यांमधून ५१ जणांनी कार्यशाळेत उपस्थिती दर्शवली. हेच आजच्या कार्यशाळेचं यश आहे.
‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ आयोजित वक्तृत्वविकास व संभाषण चातुर्य प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळा अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या “लोकमान्य सभागृह” येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेची सुरूवात ‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ चे अध्यक्ष उमेश येवले आणि कार्यशाळेचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ चे अध्यक्ष उमेश येवले यांनी आपल्या छोटेखानी आणि नेमक्या प्रास्ताविकात ट्रस्टचा २४ वर्षांचा इतिहास उलगडला. आजवर केलेले समाजपयोगी उपक्रम मांडत असताना मी काहीतरी अनन्यसाधारण काम केलं आहे याचा किंचितही मागमूस त्यांच्या शब्दांमधून जाणवत नव्हता. हेच त्यांचं जमिनीवर रहाणं यांच्यातला सामान्य कार्यकर्ता जिवंत ठेवण्यास कारणीभूत ठरते.
सदर कार्यशाळेसाठी सकाळी आल्यानंतर सर्वांना चहा नाष्टा देण्यात आला. दुपारी स्वादिष्ट जेवण आणि संध्याकाळी कार्यशाळा संपताना सर्व सहभागींना सुंदरशा सहभाग प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आलं. कवी विलास देवळेकर यांनी ‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ ने आयोजित केलेल्या ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने एक सुंदरशी कविता सादर करून वातावरण हलकेफुलके केले. कार्यशाळेच्या समारोपाला तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांना पुस्तक भेट देऊन सन्मानीत करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर कवी, पत्रकार अनुज केसरकर आणि दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे उपस्थित होते. अशाप्रकारच्या कार्यशाळा ‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ ने वारंवार घ्याव्यात, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आनंदाने करू असे कोलगे यांनी जाहीर केले आणि आयोजकांचे नवीन उपक्रम घेण्यासाठीचे मनोबल अधिक वृद्धिंगत केले. कार्यक्रमाचे नेमक्या शब्दांत सूत्रसंचालन साहित्यिक पत्रकार आणि कार्यशाळेचे समन्वयक गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशिर्वादच्या पुजा येवले आणि पदाधिकार्‍यां समवेत विनय भोजने, राजेंद्र खानविलकर, इसरार खान, रामबली शर्मा, महेंद्र रहाटे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी चोख ध्वनी व्यवस्था निलेश आणि जॉन यांनी केली. तर संपूर्ण कार्यशाळेचे उत्तम छायाचित्रण जगदीश यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com