छायाचित्रकार हेमंत सावंत यांचे व्याघ्रजीवनशैलीवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन

मुंबई : छायाचित्रकार हेमंत सावंत व्याघ्रजीवनशैलीवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत सुरु आहे. सदर प्रदर्शनास प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार श्री.काकूभाई कोठारी, तसेच श्री. सुरेश शेट्टी, माजी आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य व वन्यजीव छायाचित्रकार, श्री. गिरीश मिस्त्री, शारी प्रोफेशनल फोटोग्राफी संस्थाचे संचालक आणि प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. यावेळी श्री. मुकुल वासनिक म्हणाले “हेमंत सावंत यांनी सर्वात सुंदर प्राणी आपल्या कॅमेऱ्यात अतिशय सुंदरपणे टिपले आहेत. हेमंतने तंत्रज्ञानाचा हुशारीने वापर करून सुंदर फोटो काढले आहेत.” हे प्रदर्शन भारतातील वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास मदत करेल. या वाइल्डलाइफ फोटोग्राफी प्रदर्शनाद्वारे, लोक आणि मुले भारतातील वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबद्दल अधिक जागरूक होऊ शकतात. मोठ्या संख्येने मुले भारतातील वन्यजीव संरक्षणाबद्दल अधिक जागरूक होतील. मुलांमध्ये प्रबोधन केल्याने आपण भारतातील वन्यजीवांसाठी चांगले जीवन पाहू शकतो.
यावेळी छायाचित्रकार हेमंत सावंत म्हणाले, माझ्या स्वप्नातही वाटले नाही की मी येथे एक उत्कट वन्यजीव छायाचित्रकार म्हणून तुमच्यासमोर उभा राहीन. २०१६ मध्ये, माझी मुलगी सलोनी माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट बनली आणि तिने मला वन्यजीव फोटोग्राफीच्या जगात खेचले. फोटोग्राफीच्या प्रवासात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी पत्नी चित्रा आणि मुलींचे आभार मानले. तसेच कोरोनाच्या संकटात असताना उद्घाटनाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी उपस्थितांचेही आभारही मानले आणि ते म्हणाले की, माझा हा छोटासा प्रयत्न भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणार असेल तर माझे काम सार्थकी लागले आहे.
आजवर त्यांनी एक जंगल ते दुसरे जंगल केलेल्या प्रवासात कान्हा, बांधवगड, पन्हा, मेळघाट, ताडोबा, पेंच, रणथंबोर, जिम कॉर्बेट या जंगलात जाऊन व्याघ्रजीवनशैलीचा अभ्यास करीत असताना त्यांच्या कॅमेऱ्यात महत्त्वाचे क्षण टिपले आहेत त्यात आनंदी व आळस देणारा वाघ, आक्रमक आणि चपळपणा असणारा वाघ, ऐटबाज चाल असणारा वाघ, मित्रांसोबत पाण्यातून धावत रममाण होणारा वाघ, आपल्या पिल्लांची काळजी घेणारी कुटुंबवत्सल वाघीण अशा अनेक गोष्टी पाहावयास मिळतात.
या प्रदर्शनात सुमारे ५० छायाचित्रे मांडण्यात आली असून त्यांच्या अनुभवांची माहितीपट व्हिडिओ फिल्म लोकांसमोर मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. हेमंत सावंत यांनी लोकांना ‘टायगर शोचा आनंद घ्या’ असे आवाहन केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com