मुंबई: “अरे मानवा, तूच वसुंधरेचा आधार ! जगव वृक्ष वनांना, तेच खरे तारणहार !!” ह्याच उक्तीला साजेसं काम मुंबईच्या शिवडी परिसरात होत आहे. त्यासाठी विभागीय शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पुढाकार घेतला आहे.
पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “माझी वसुंधरा” ही संकल्पना अमलात आणली. या संकल्पनेनुसार काल प्रभाग क्रमांक २०६ मधील स्वर्गीय श्री. मोहन रावले उद्यानातील रिकाम्या जागेत “मियावाकी पद्धतीने” म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावण्याच्या पद्धतीने रोपं लावण्यात आली. ह्या पद्घतीने लावलेली झाडे आजूबाजूला न पसरता सरळ उंच वाढतात. या उद्यानात विलायती मेंधी, कदंब वृक्ष, पोफळी, नीम, कांचन वृक्ष, आवळा, वड, पिंपळ, ताम्हण, आंबा, करंज, अशोक, महोगनी वनस्पती, जांभूळ, बदाम, बकुळ, सागवान, चाफा अशी विविध प्रकारची ५०० झाडे लावण्यात आली. या कामाचे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखासंघटक शुभदा पाटील तसेच शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.