अधिवेशनाला वादळी सुरुवातराज्यपालांना सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मिळाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. अपेक्षेनुसार अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली आहे. मात्र, विरोधकांमुळे नसून सत्ताधाऱ्यांमुळेच ही वादळी सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे.

नेहमीच्या पद्धतीनुसार राज्यपाल विधिमंडळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र, आज राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपलं भाषण अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळलं आणि ते निघून गेले. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाने कठोर भूमिका मांडली असून सत्ताधारी काँग्रेसकडून “राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

“महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com