शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केली दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख

मुंबई – यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे काही अडसर निर्माण झाले. पण यावरही मात करुन नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिराने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली आहे.
२३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान इयत्ता १२ वी परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान इयत्ता १० वीची परीक्षा घेतली जाणार आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

देशासह राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे यावेळीच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही याबाबत वारंवार विचारणा करण्यात येत होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले जात होते.

आज वर्षा गायकवाड यांनी अखेर परीक्षांचा कालावधी जाहीर करुन राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दिला आहे. कोरोनाचा काळ लक्षात घेता या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे अतिशय कठीण असल्याचे मत याआधीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com