प्रस्थापित पक्षांच्या विरोधात, नवीन पर्याय निर्माण करणार्‍या, लोकशाही आघाडीची नागपूरमध्ये २० जून रोजी विभागीय बैठक

मुंबई : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मागासवर्गीयांना न्याय देण्यात कमी पडले आहे. फुले-शाहू-आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मागासवर्गीयांची, बहुजनांची मते घेऊन ह्या पक्षांनी सत्ता मिळवली आहे.
मात्र ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळू नये, असाच ह्या प्रस्थापित पक्षांचा डाव आहे. म्हणून एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या पदोन्नतीतील आरक्षण सुद्धा दोन्ही पक्षांनी असेच अडकवून ठेवले आहे.ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्यासाठी २००६ला कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सवलती, सरकारी नोकरीतील लाखांचा शिल्लक असलेला अनुशेष, खाजगीकरण कंत्राटीकरण, कोतवालांना चतुर्थ श्रेणी नाकारणे, कामगार विरोधी कायदे, गगनाला भिडणारी महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव शंभरावर कधीच गेले आहेत, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, घर ह्या मुलभूत हक्कासाठी सातत्याने अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसींना तसेच सर्वसामान्य माणसाला संघर्ष करावा लागतो आहे.
त्यामुळे ह्या आरक्षण विरोधी पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी नुकतीच मुंबईत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची बैठक घेऊन “लोकशाही आघाडीची” घोषणा करण्यात आली आहे. “लोकशाही आघाडीची” नागपूर विभागीय बैठक सोमवार दि. २० जून २०२२ रोजी दुपारी १वा रविभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. ह्या बैठकीला नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथील लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “लोकशाही आघाडीच्या” ह्या विभागीय बैठकीत सहभागी होण्यासाठी ओबीसी नेते मा. खा. हरिभाऊ राठोड, रिपब्लिकन पक्ष खोरिपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. उपेंद्र शेंडे, राष्ट्रीय सरचिटणीस मा. देशक खोब्रागडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष मा. मधुकरजी उईके, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. हरीशजी उईके, जनहित लोकशाही पार्टीचे, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोकराव आल्हाट, इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे अध्यक्ष मा. आनंदा होवाळ,कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष मा. अरुण गाडे, ओबीसी जागर अभियानाचे नेते मा. लताताई बंडगर, मा. शामराव निलंगेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी लोकशाही आघाडीच्या ह्या बैठकीला नागपूर विभागातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते, नेते यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com