माझी निष्ठा राजसाहेबांना अर्पित आहे – बाळा नांदगावकर

मुंबई : मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा समाज माध्यमातून सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर होत आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बाळा नांदगावकर हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संदेश समाज माध्यमांमधून सामायिक होत आहेत. त्यावर उत्तर देताना बाळा नांदगावकर म्हणाले, “एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका ओळीत सांगून जाते. “तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम”.” गाण्याच्या एकाच ओळीत नांदगावकरांनी ह्या खोडसाळ वृत्ताचे खंडन केले.
माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर पुढे म्हणाले, “मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. समाज माध्यमांच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस चांगलेच माहीत आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात, पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही आणि जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही.”
सध्या राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी ठाकरे आणि नांदगावकर सोबत होते. राज ठाकरे पुण्याला रवाना झाले तेव्हा नांदगावकर मुंबईत परतले. त्यांच्या शिवडी मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयाचे १८ डिसेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी नांदगावकर मुंबईत परतले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com