माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्घाटन

हुतात्मा दालनाचे उद्घाटन तसेच ‘अतुल्य हिंमत’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी आश्वस्तही केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले;

२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व हुतात्मा पोलिसांच्या शौर्याला मी वंदन करतो. प्राणांची पर्वा न करता, कुटुंबियांहून अधिक महत्त्व कर्तव्याला देणाऱ्या या पोलिसांसमोर, त्यांच्या कुटुंबियांसमोर मी नतमस्तक होतो. शासनातील, प्रशासनातील सहकारी इथे उपस्थित आहेत, त्यांना नमस्कार??

२६ जानेवारी आणि २६ नोव्हेंबर… एक प्रजासत्ताक दिन आणि एक शौर्य दिन. आजही मी ती रात्र विसरलो नाही. निवडणुकांनिमित्त मी धुळे-नाशिक प्रवासात होतो आणि अचानक फोनवरून कळलं की मुंबईत गोळीबार होतोय. हा अतिरेकी हल्ला असेल असं वाटलंच नाही. इतकं धाडस अतिरेकी करतील, अशी कल्पनाही नव्हती.

विजय साळसकरांना फोन केला. ते म्हणाले “आत्ताच घरी पोहोचलोय, नेमकं काय आहे ते कळलं नाही, आता निघतोय परत.” नंतर बऱ्याचदा आमचा फोन झाला. ते ताजच्या समोर होते. आत जातोय म्हणाले. पण, त्यानंतरच्या माझ्या फोनला त्यांनी कधीही उत्तर दिलं नाही. नंतर टीव्हीवर पाहिलं तेव्हा नको तीच बातमी समजली.

हे सगळं सून्नं करणारं होतं, कल्पनेच्या पलिकडलं. वर्ष उलटत जातील पण काळजावर झालेली जखम भरून न येणारी आहे. मानवंदन, अभिवादन हे सगळं ठीक आहे, ते होत राहील. आम्ही कर्तव्य म्हणून करतो. आम्ही राजकारणी सभा, मोर्चे, मिरवणुका काढतो, हे सगळं एक दिवस. पण, पोलिसांचं काम रोजचं, २४ तास सुरू.

पण पोलिसांना सणवार, दिवाळी, भाऊबीज काही नाही. खरंतर हे त्यांचं कर्तव्य नाही, उपकार आहेत. या पुस्तकात गणपती विसर्जनाचे फोटो पाहिले. मी सुद्धा काढलेत असे फोटो. तेव्हा समुद्रापेक्षा जास्त भरती लोकांच्या उत्साहाला येते. या भरतीला कंट्रोल करतात पोलिस.

स्वत:चं जीवन दुर्लक्षित करून, आपल्या घरातलं सुख-दु:ख, ताणतणाव घरी ठेवून जनेतच्या सुख-दु:खात सामील होतात पोलिस. दिवसभर मेहनत करून घरी जातात. पोलिसही माणूस आहे, त्यालाही घर आहे. पण, त्यांची घरं कशी आहेत, हे पण पाहायला हवं. त्यासंदर्भातही आम्ही काम करतोय.

या पुस्तकाबद्दल मी सुबोधजींना खूप धन्यवाद देतो. हे पुस्तक मी तीन भूमिकांमधून पाहिलं. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, या राज्याचा नागरिक आणि एक कलाकार म्हणूनही. मुख्यमंत्री आणि नागरिक म्हणून मला या पुस्तकाचा अभिमान वाटतोच. पण, कलाकार म्हणून हे पुस्तक अप्रतिम आहे, असं मला वाटतं.

पोलिसांचं काम इतकं आहे की पुस्तकामागून पुस्तकं निघतील. पण सुबोधजींनी हे अत्यंत संक्षिप्त पद्धतीने उत्तम सादर केलंय. कोरोनाचं काम करणारे,धान्य वाटप करणारे पोलिस असे फोटो आहेत. मुलीसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या महिला पोलिसाचाही फोटो आहे. पोलिसांच्या आयुष्यातले विविध पैलू त्यात आणलेत.

या गॅलरीबद्दलही धन्यवाद देतो. इथे शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. पोलिसांची कहाणी मांडण्यात आली आहे. हा उपक्रम राज्यभर अंमलात आणायला हवा. मुंबईतही मोक्याच्या ठिकाणी, प्रमुख शहरांमध्ये लोकांना पोलिसांचं आयुष्य नेमकं कसं असतं, हे पाहता यायला हवं.

आपल्याकडे पोलिसांवर हल्ले होतात, त्यांच्याशी हुज्जत घातली जाते. नुकताच आपला एक जवान अशा हल्ल्यात शहीद झाला. सिंगापूरचा माझा अनुभव आहे. तिथे शालेय शिक्षणात पोलिसी प्रशिक्षण अनिवार्य आहे. या वयातच ही शिस्त भिनली की पोलिसांना काय करावं लागतं, हे कळेल.

तुमचे आभार मानले की झालं असं नाही. तुमची काळजी घेणं, तुम्हाला तंदुरुस्त ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्यासाठी काही केलं नाही तर राज्यकर्ते म्हणून आम्ही नालायक ठरू. सक्षमीकरण असं हवं की मुंबई पोलिसांचं नाव घेतलं तरी अतिरेकी मुंबई, महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा विचारही करणार नाही.

आर्थिक चणचण आहेच. पण, त्यातही कोरोना आला म्हणून आपण आरोग्य सुविधा उभारल्याच ना? हेही होईल. म्हणून सांगतोय, ज्या काही तुमच्या योजना असतील त्या घेऊन या. मी वचन देतो जे जे काही करण्यासारखं आहे ते करणार म्हणजे करणारच.

पुन्हा एकदा या सर्व शुरवीरांसमोर, त्यांच्या शूर कुटुंबियांसमोर नतमस्तक होतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com