मुंबई : गेल्या सहा वर्षांपूर्वी माहीम धारावीला जोडणाऱ्या दादर – धारावी नाल्यावरील पूल अचानक कोसळला. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चालक किरकोळ जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर खा. राहुल शेवाळे यांनी स्थानिक नगरसेविका मरियाम्मल मुत्तू तेवर यांच्यासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महानगर पालिका ब्रिज डिपार्टमेंट कडून १३ कोटी रुपयांचा निधी पास करून कामाचे भूमिपूजन केले होते. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना भूमिगत जाणाऱ्या धारावी मेट्रोचा मोठा अडथळा निर्माण झाला. तेव्हा त्या पुलाचे काम दोन टप्यांत करण्याचे मनपा प्रशासनाने ठरवले. धारावीला जोडणाऱ्या दादर धारावी नाल्यावरील पुलाचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. पुलाच्या निर्माणाधिन कामात मेट्रोचा अडथळा आल्याने पुलाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले होते. धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार, उपविभाग प्रमुख प्रकाश आचरेकर, राजू सूर्यवंशी, जोसेफ कोळी, गणेश तेवर, शाखाप्रमुख मुत्तू पत्तन, किरण काळे, आनंद भोसले, संजय काळे, सतीश कटके यांच्या उपस्थितीत स्थानिक नगरसेविका मरियाम्मल मुत्तू तेवर यांच्याहस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले.