नवी दिल्ली – मागील 359 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर विरोधी पक्षांचे नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी शेतकरी आंदोलकांचे अभिनंदन केले आहे, तसेच सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहंकाराची मान देशाच्या अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर झुकली आहे. अन्यायाविरोधातील या विजयाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय हिंद किसान, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सरकारची भूमिका आडमुठी होती. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडले गेले. शेतकऱ्यांना देशातील जनतेचा पाठिंबा होता. 13 राज्यातील पोट निवडणुकीत पराभव झाला. महागाई अशा गोष्टींमुळे हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा विजय. हे काळे कायदे राजकीय भयातून मागे घेतले. दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व एकत्र आलो, म्हणूनच हा विजय असल्याचे संजय राऊत म्हणाले.
तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायद्यांविरोधात अथक लढा देणाऱ्या आणि भाजपच्या क्रौर्यासमोर न खचणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे अभिनंदन. ज्यांनी आपल्या प्रियजनांना या लढाईत गमावले त्यांच्याप्रती सहवेदना, असे म्हटले आहे.