मेरी कोम, सिंधूसह दहा क्रीडापटू ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर

भारतीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओए) खेळाडू समितीमध्ये (अ‍ॅथलिट कमिशन) पाच वेळच्या जगज्जेत्या मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्यासह दहा खेळाडूंची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवी दिल्ली : नव्या घटनेनुसार निर्माण करण्यात आलेल्या भारतीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओए) खेळाडू समितीमध्ये (अ‍ॅथलिट कमिशन) पाच वेळच्या जगज्जेत्या मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्यासह दहा खेळाडूंची बिनविरोध निवड करण्यात आली. खेळाडू समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान ही निवड करण्यात आली. हिवाळी ऑलिम्पिकमधील खेळाडू शिवा केशवन, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमल, हॉकीपटू राणी रामपाल, ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलेली तलवारबाजी खेळाडू भवानी देवी, रोईंगपटू बजरंग लाल आणि माजी गोळाफेकपटू ओपी कऱ्हाना या अन्य खेळाडूंचा या समितीत समावेश आहे.

निवडण्यात आलेल्या १० खेळाडूंपैकी पाच महिला खेळाडू असून, सर्वानी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. केवळ केशवन हा हिवाळी ऑलिम्पिकचा खेळाडू आहे. समितीत १० खेळाडूंचा समावेश असणार असून, यासाठी दहाच खेळाडूंनी अर्ज भरला होता. ‘आयओए’च्या आगामी निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे उमेश सिन्हा यांनीच या खेळाडूंची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
अभिनव बिंद्रा, सरदार सिंगची थेट निवड
भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा २०१८ पासून आठ वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या, तर माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग २०१९ पासून चार वर्षांसाठी ऑलिम्पिक परिषदेच्या खेळाडू समितीवर आहेत. यामुळे दोघांची ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर थेट निवड करण्यात आली. अशा पद्धतीने खेळाडू समितीच्या १२ जागा पूर्ण होतात. या दोघांना मतदानाचा अधिकार असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com