टाटा आयपीएल – बेंगळुरूचा रॉयल विजय

मुंबई : टाटा आपीएल २०२२ चा एकतीसावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा सामना १८ धावांनी जिंकला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सर्वाधिक धावा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने ११ चौकार आणि २ षटकाराच्या सहाय्याने ६३ चेंडूंत ९६ धावा काढल्या. जेसन होल्डरने त्याला २०व्या षटकात बाद केले. फाफ ड्यू प्लेसिस आपीएलमध्ये ९६वर बाद होण्याची दुसरी वेळ ठरली. ग्लेन मॅक्सवेलने ३ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने केवळ ११ चेंडूंत २३ धावा काढल्या. कृणाल पांड्याने त्याला बाद केले. शहबाझ अहमदने २६ धावा काढल्या. त्याला कर्णधार के. एल. राहुलने धावचीत केले. दिनेश कार्तिकने एका षटकाराच्या सहाय्याने बिनबाद १३ धावा काढल्या. दुश्मंथा चमिराने पहिल्याच षटकात ७ धावांमध्ये दोन गडी बाद केले आणि बेंगळुरूचं कंबरडंच मोडलं होतं. जेसन होल्डरने ४-०-२५-२ तर दुश्मंथा चमिराने ३-०-३१-२ आणि कृणाल पांड्याने ४-०-२९-१ गडी बाद केले. बेंगळुरूने १८१/६ असं लखनौसमोर तगडं आव्हान उभं केलं.
लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ४२ धावा काढल्या. त्याला ग्लेन मॅक्सवेलने बाद केले. कर्णधार के. एल. राहुलने ३ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ३० धावा काढल्या. त्याला हर्षल पटेलने बाद केले. दीपक हुडाने १३ धावा काढल्या. त्याला महंमद सिराजने बाद केले. १४व्या षटकात १०८ धावांमध्ये लखनौचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मार्कस स्टॉइनिसने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १५ चेंडूंत २४ धावा काढल्या. त्याला जोश हेझलवूडने बाद केले. जेसन होल्डरने २ षटकारांसह १६ धावा काढल्या. त्याला हर्षल पटेलने बाद केले. आयुष बदोनीने १३ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा जोश हेझलवूडने उध्वस्त केला. जोश हेझलवूडने ४-०-२५-४, हर्षल पटेलने ४-०-४७-२, ग्लेन मॅक्सवेल २-०-११-१, महंमद सिराजने ४-०-३१-१ यांनी गडी बाद केले. लखनौचा संघ १६३/८ इतकीच मजल मारू शकला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा सामना १८ धावांनी जिंकला.
फाफ ड्यू प्लेसिस ला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ९६ धावा काढल्या होत्या.
उद्या दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. पंजाब हा सामना जिंकून गुणतक्त्यात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com