टाटा आयपीएल – बेंगळुरू ८ गडी राखून विजयी

मुंबई : टाटा आयपीएल २०२२ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. बेंगळुरूने ८ गडी आणि ८ चेंडू राखून हा सामना जिंकला. गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार हार्दिक पाड्याने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूंत नाबाद ६२ धावा काढल्या. डेव्हिड मिलरने ३ षटकारांसह ३४ धावा काढल्या. त्याला वाणींदू हसरंगाने बाद केले. यष्टिरक्षक वृद्धिमान सहाने ४ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३१ धावा काढल्या. त्याला फाफ ड्यू प्लेसीसने धावचीत केले. मॅथ्यू वेडला ग्लेन मॅक्सवेलने १६ धावांवर पायचीत टिपले. शेवटी फलंदाजीसाठी आलेल्या राशीद खानने १ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ६ चेंडूंत नाबाद १९ धावा काढल्या. त्यामुळे दिल्लीच्या खात्यावर १६८/५ अशी धावसंख्या दिसू लागली. जोश हेझलवूडने ३९/२, वाणींदू हसरंगा, ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसीस यांनी संघाला भक्कम सुरूवात करून दिली. त्यांची ११५ धावांची भागीदारी राशीद खानने भेदली. त्याने फाफ ड्यू प्लेसीसला बाद केले. फाफ ड्यू प्लेसीसने ५ चौकारांच्या सहाय्याने ४४ धावा काढल्या. पुढच्याच षटकात राशीद खानने विराट कोहलीला बाद केले. विराटने ८ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५४ चेंडूंत ७३ धावा काढल्या. ग्लेन मॅक्सवेलने शेवटच्या १२ चेंडूंत १२ धावांची गरज असताना लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर ३ चौकार मारत विजयी लक्ष गाठले. त्याने ५ चौकार आणि २ षटकाराच्या सहाय्याने १८ चेंडूंत ४० धावा काढल्या.
बेंगळुरू ह्या विजयासह चौथ्या क्रमांकावर पोहचले. पण मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यावर त्यांचं भवितव्य ठरणार आहे. गुजरात पराभूत झाल्यानंतरही क्रमांक एक वर विराजमान आहेत. ते थेट पहिला प्ले-ऑफचा सामना खेळतील.
विराट कोहलीला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना ५४ चेंडूंत ७३ धावा काढल्या होत्या.
उद्याचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान हा सामना जिंकून दुसर्‍या क्रमांकावर झेप घेऊ शकतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com