अफगाणिस्तान : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र आहेत, पण तालिबान सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबतचे आयात आणि निर्यात (Import-Export) दोन्ही बंद केले आहेत. तालिबाननं भारतासोबतची सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमतीही वाढणार असल्याचं चित्र आहे.
वृत्तसंस्था ANI ला डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं की, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकू. पण सध्या तालिबानने निर्यात-आयात बंद केली आहे.