राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नव्हते. सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे २ जानेवारी २०२२ ला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगने म्हंटलं आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा ३९० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.
महाराष्ट्रात ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादेची अट ओलांडली आहे अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात १७ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आयोगामार्फत रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
१७ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी झाला होता त्यामध्ये १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ दरम्यान ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना दिलासा देण्यात आला असून ते विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतील आणि त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी असेल. त्यासाठी अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांनी २८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ रात्री १२ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन शुल्कासह भरायचे आहेत. दरवर्षी साधारणपणे १८ ते २० लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्या नाहीत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com