सिंधू पाचव्यांदा उपांत्य फेरीत पराभूत

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधूसाठी गेली दोन वर्षे खास राहिली नाहीत. ऑगस्ट २०१९ मध्ये नोझोमी ओकुहाराचा पराभव करून वर्ल्ड चॅम्पियन बनल्यापासून तिने ऑलिम्पिकसह १९ स्पर्धा खेळल्या आहेत, पण त्यानंतर तिला एकाही स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नाही. २०२१ इंडोनेशिया ओपन सुपर १००० च्या उपांत्य फेरीतही तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शनिवारी (२७ नोव्हेंबर) झालेल्या उपांत्य फेरीत सिंधूला थायलंडच्या माजी विश्वविजेत्या रेचानोक इंतानोनने फक्त ५४ मिनिटांत पराभूत केले. तिसऱ्या मानांकित सिंधूला जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोकने १५-२१, २१-९, २१-१४ असे पराभूत केले. २०२१ या वर्षी तिचा उपांत्य फेरीतील हा पाचवा पराभव ठरला. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप, टोकियो ऑलिम्पिक, फ्रेंच ओपन, इंडोनेशिया मास्टर्स आणि आता इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच इंडोनेशिया मास्टर्समध्ये अकाने यामागुचीने पराभूत केले होते.

१९ स्पर्धांमध्ये विजेतेपदापासून राहिली दूर
ऑगस्ट २०१९ मध्ये पी.व्ही. सिंधू जपानच्या नाझोमी ओकुहाराला पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियन बनली होती, पण त्यानंतर दोन वर्षांत तिने १९ स्पर्धा खेळल्या असून एकाही स्पर्धेचं जेतेपद तिला जिंकता आले नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीतही तिचा पराभव झाला, पण त्यानंतर कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत तिने विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

२०२१ मध्ये सिंधूची कामगिरी चांगली राहिलेली नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कामगिरी वगळता तिची कामगिरी साधारणच राहिली आहे. या वर्षी आतापर्यंत तिने ऑलिम्पिकसह १० स्पर्धांमध्ये भाग घेतला, पण तिला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com