NEP 2020 रद्द करा, शेतकरी – कामगार विरोधी कायदे रद्द करा, 100 टक्के अनुदान द्या, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांना शाळा- कॉलेजमध्ये 50% उपस्थितीची अट रद्द करा, व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा – कॉलेज सुरु करू नका यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक भारतीने आज देशव्यापी संपात राज्यभर सहभाग नोंदवला. मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात आयफुक्टो, एमफुक्टो, बुक्टू आणि शिक्षक भारती सह इतर पालक, कामगार संघटनाही सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
यावेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, एमफुक्टोच्या नेत्या डॉ. ताप्ती मुखोपाध्याय, प्राध्यापकांचे नेते किशोर ठेकेदत्त, बुक्टूच्या नेत्या मधु परांजपे यांनी मार्गदर्शन केलं.
26 नोव्हेंबर रोजी शिक्षण विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा पाडाव व्हावा म्हणून राज्यात सातत्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. मागील काही वर्षांमध्ये शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणं सातत्याने रावबली जात आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण, कंपनीकरण सुरू आहे. आणि आता NEP 2020 आलेलं आहे. NEP 2020 मुळे जवळपास 1 लाख अनुदानित शाळा आणि 35 हजार कॉलेजेस बंद होणार आहेत. त्यामुळे अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस निघणार आहे. त्यामुळे गरीब, वंचित वर्गाचं शिक्षण संकटात येणार आहे. या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आजच्या संपात सहभागी झाल्याचं मोरे यांनी सांगितलं.
यावेळी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्ष कल्पना शेंडे, दक्षिण विभाग अध्यक्ष राधिका महांकाळ, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल गंगावणे, मनपा युनिटचे साहेबराव खांडेकर, सलीम शेख, वसंत उंबरे, अशोक शिंदे, दिलीप मेखा, पराग साळगावकर, दिलीप भगांरे, प्रजापती सर, कैलास गुंजाळ, विजय गवांदे, अशोक मेका, दयाळ सर, जाधव सर, इथापे सर, काळे मॅडम, तुपे मॅडम आदी उपस्थित होते.