मुंबई : कल्याण येथील ज्येष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. ब्रुहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी दामुभाई ठक्कर यांना गिरनार जीवनगौरव २०२२ पुरस्कार जाहीर केला असून बुधवार, २० एप्रिल २०२२ रोजी फोर्ट मुंबई येथील जन्मभूमी भवन सभागृहात एका शानदार सोहोळ्यात जन्मभूमी चे सीईओ आणि मुख्य संपादक कुंदन व्यास यांच्या शुभहस्ते दामुभाई ठक्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ब्रुहन्मुंब ई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शाह, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नागजी रीटा, उपाध्यक्ष अरविंद शाह, महासचिव राजेश दोशी, सचिव एडवोकेट पीयूष एम. शाह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दामुभाई ठक्कर हे गेल्या सत्तर वर्षांपासून पत्रकारिता करीत असून आजही ते कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या तसेच पत्रकार भवनाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भय्यासाहेब सहस्त्रबुद्धे, कृ. वि. तथा नाना पेठे, श्रीकांत नेर्लेकर, विजय वैद्य, वसंतराव त्रिवेदी, मधुकर उपासनी, आप्पासाहेब भडकमकर, गो. ना. सोहोनी, गोपाळराव फडके, विनायक बेटावदकर, राजाराम माने, स. पां. जोशी, नरेंद्र बल्लाळ आदींबरोबर दामुभाई ठक्कर यांनी पत्रकार संघात कार्य केले आहे.