मुंबई : कोविड काळात बर्याच आस्थापनांमधून कर्मचारी कमी केले गेले. काही कुटुंबातले कमावते व्यक्ती ह्या आजारात बळी पडले. कौटुंबिक जबाबदारी तरूणांनी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. पण नोकरी देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत सामाजिक, मानसिक आणि आर्थिक घडी विस्कटली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पद्मा नगर रोड नंबर १४, बैगनवाडी शिवाजी नगर गोवंडी मुंबई – ४३ या ठिकाणी संकल्प संस्था आणि ब्राइट फ्यूचर यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ३० वयोगटातील शिवाजी नगर, गोवंडी विभागातील युवकांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी नगर गोवंडी हा विभाग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे. असंघटित, कचरा वेचक, नाका कामगार, कष्टकरी कामगार कुटुंबातील १५० युवक युवतींनी ह्या मेळाव्याचा लाभ घेतला.
उपरोक्त मेळाव्यात युवकांच्या शिक्षणाच्या आधारावर संकल्प संस्था आणि ब्राइट फ्यूचर यांच्या मार्फत त्यांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास उपस्थित युवकांना रेशन किट, सॅनिटायझर आणि मास्क देखील वाटण्यात आले. सदर मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ब्राइट फ्यूचरच्या नौशीन अन्सारी यांचे विशेष सहकार्य लाभले.