मुंबई : ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या (जेएफआय) नॅशनल सब ज्युडो आणि कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपसाठी चंदीगड विद्यापीठाच्या प्रांगणात ९ नोव्हेंबरपासून खेळाडूंमध्ये चुरस होणार आहे. यातून निवडलेल्या खेळाडूंना लेबनान येथे २ ते ५ डिसेंबर या कालावधीत तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे देशभरातील खेळाडू आपले कसब पणाला लावतील आणि अप्रतिम खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
जेएफआयचे सदस्य असलेल्या खेळाडूंमध्ये २१ वर्षांखालील वयोगटात आणि ४४ किलो महिला व ५५ किलो पुरुषांच्या वजनी गटात या स्पर्धा होणार आहेत. ज्युडो फेडरेशन असोसिएशनने यासाठी नियमावली जाहीर केली असून कोविड टेस्ट ७२ तास अगोदर केली तरच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी ४ मिनिटांचा कालावधी असून गोल्डन स्कोअरसाठी रेफ्रीच्या इच्छेपर्यंत वेळेची मर्यादा नाही.