मुंबई : आंतरराष्ट्रीय सत्रावर खेळतानाही वयाची ३५ शी गाठलेल्या खेळाडूंवर खेळ सोडण्यासाठी निवृत्तीसाठी दबाव टाकला जातो. तिथे मुंबई टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू वयाची ७० वर्ष झाली तरीसुद्धा युवकांना लाजवतील अशी कामगिरी मैदानात करत आहेत. हीच बाब हेरून नामांकित खेळाडू चंद्रकांत शिंदे, विजय तळेकर, राजू पाटील, सुरेश महाडीक (चिंत्या) यांनी ५० प्लस लेजंड स्पर्धेचं जबरदस्त आयोजन घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात केले होते. ४० संघ आणि ६०० खेळाडूंनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग असलेली ५०पेक्षा जास्त वयोमान असलेल्या खेळाडूंची ही पहिलीच स्पर्धा आहे.
५० वर्षांवरील लेजंड खेळाडूंची पहिली भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा हरिश इलेवन, बेलापूर संघाने जिंकली तर उपविजेतेपद राहुल इलेवन, परेल यांनी पटकावले. सर्वोत्कृष्ट फलंदाज संजीव परब, सर्वोत्कृष्ट गोलंदाज जब्बार, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेश मकवाना यांनी अप्रतिम खेळ करून आपले नाव कोरले. तर अंतिम सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू हिरामन पाटील आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून विक्रांत खोत यांची निवड झाली.
सदर स्पर्धेला डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई यांची वैद्यकीय व्यवस्था गुरुदत्त वाकदेकर यांच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध झाली. डॉ. विराज कुलकर्णी, रोशना टी. एस., दीपक त्रिंबककर आणि विक्सन दिवे यांनी स्पर्धे दरम्यान खेळाडूंना सुरक्षित वातावरण निर्माण करून दिलं.
माजी आमदार आणि क्रिकेटपटू अशोक जाधव, प्रभाग क्रमांक १३१च्या नगरसेविका राखी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेसाठी खास हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं.
पंचांची महत्त्वाची भूमिका अमित गोलतकर, सुनिल मंचेकर, ओंकार कानाडीकर, गणेश कांबळे, सुरेश राणा, संदीप पवार यांनी पार पाडली. तर संपूर्ण स्पर्धेचं धावत समालोचन पाटील, हरिश मिश्रा आणि सप्तर्षी अय्यर यांनी आपल्या सुमधूर वाणीने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये आळीपाळीने केले. युट्युबच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरज चौधरी, सतिश सिंग आणि अमोल मुंगेकर यांनी केले आणि देशविदेशांमधील टेनिस क्रिकेटप्रेमींना आनंद घेता आला.