महाराष्ट्राला झोडपणार गुलाब चक्रीवादळ

मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता गुलाब नावाचे चक्रीवादळात झाले असून, रविवारच्या सायंकाळी ओरिसा – आंध्रप्रदेशच्या किनारी भागात हे चक्रीवादळ धडकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र ओलांडून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही शक्यता जर का खरी ठरल्यास राज्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले असून, २६ सप्टेंबर रोजी दक्षिण ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशच्या समुद्राचा उत्तरेकडील भाग, तेलंगणा, उत्तर छत्तीसगड आणि उत्तर ओरिसामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळले. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, ओरिसा, मराठवाडा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल किनारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळले.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, हवामानात झालेल्या बदलामुळे पूर्वेकडील समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

२७ सप्टेंबर : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

२८ सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

२६ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

२७ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.

२८ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर किनारपटटीवर सोसाटयाचा वारा वाहील.

२९ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उत्तर किनारपटटीवर सोसाटयाचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com