गुजरात टायटन्सने विजयाचा नारळ वाढवला

मुंबई : गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा चौथा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघ नव्यानेच आपीएलमध्ये खेळत असल्यामुळे तज्ज्ञांना आणि प्रेक्षकांना शेवटच्या षटकापर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागली.
गुजरातने क्षेत्ररक्षण स्वीकारल्याचा निर्णय महम्मद सामीने सार्थ ठरवला. सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर त्याने लखनौच्या कर्णधार के. एल. राहुल याला शून्यावर यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकडे झेल देण्यास भाग पाडले. तिसर्‍या पंचांनी त्याला बाद ठरवले. प्रारंभिक फलंदाज क्विंटन डिकॉक याचा सामीने वैयक्तिक दुसर्‍या आणि सामन्या तिसर्‍या षटकात त्रिफाळा उध्वस्त केला. पुढच्याच षटकात वरून अरुणने इव्हिन लुईसला शुभमन गीलकडे झेल देण्यास भाग पाडले. सामन्याच्या पाचव्या षटकात पुन्हा सामीने आपलं रौद्र रूप दाखवलं आणि मनीष पांडेचा त्रिफाळा उध्वस्त केला. लखनौची अवस्था ४.३ षटकांत २९/४ अशी दयनीय झाली होती.
दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी हळूहळू धावा जमवायला सुरूवात केली. १६व्या षटकाच्या सुरूवातीला हुडा रशीद खानच्या गोलंदाजीवर चकला आणि पायचीत झाला. त्याने ६ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ४१ चेंडूंत ५५ धावा काढल्या. धावफलक ११६/५ अशी बर्‍यापैकी धावसंख्या दाखवत होता. कृणाल पांड्याच्या जोडीने बदोनीने धावफलकावर ४० धावा जोडल्या आणि शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याकडे वरून अरूणने त्याला झेल देण्यास भाग पाडले. २०व्या षटकाच्या अखेरीस लखनौच्या खात्यावर १५८/६ जमा झाल्या होत्या.
गुजरात टायटन्सच्या डावाचीही सुरूवात डळमळीत झाली. शुभमन गील डावाच्या पहिल्या षटकात शून्यावर बाद झाला. दोन्ही संघांच्या प्रारंभिक फलंदांजांनी गुणफलक लेखकाला जास्त कष्ट होऊ नयेत याची काळजी घेतली. हुडाने चामिराच्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल टिपला. डावाच्या तिसर्‍या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चमिराने विजय शंकरचा त्रिफाळा उध्वस्त केला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि वेड यांनी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकने पाच चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३३ धावा काढल्या. त्याला कृणालने मनीष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या मागोमाग १२व्या षटकाच्या अखेरीस वेड बाद झाला. त्याने ४ चौकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत ३० धावा काढल्या. दीपक हुडाने त्याचा त्रफाळा उध्वस्त केला. टायटन्सच्या खात्यावर त्यावेळी ७८/४ दाखवत होत्या. अजून ८ षटकं बाकी होती आणि बराच मोठा पल्ला गाठायचा होता. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवटिया यांनी वानखेडे स्टेडियमवर झंझावाती खेळी केली. पुढच्या केवळ पाच षटकांमध्ये त्यांनी ५० धावा कुटल्या. हेच दोघं विजयी लक्ष पार करून देतील असं वाटत असतानाच निर्णायक क्षणी मिलर बाद झाला. त्याने १ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूंत ३० धावा काढल्या. त्याला आवेश खानने के. एल. राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या जागेवर आलेल्या अभिनव मनोहरने मिलरची भूमिका अंगात भिनवली आणि ३ चौकारांच्या सहाय्याने ७ चेंडूंत बिनबाद १५ धावा काढल्या. तर राहुल तेवटियाने ५ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ४० धावा काढल्या. राहुलने विजयी चौकार मारून टायटन्सच्या नावावर पहिला विजय नोंदवला. १९.४ षटकांत टायटन्सच्या खात्यावर १६१/५ वजयी धावा जमा झाल्या होत्या. एक थरारक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आणि या सामन्यात लखनौच्या डावाला खिंडार पाडणार्‍या महम्मद सामीला सामन्याचा खेळाहू हा बहुमान देण्यात आला. त्याने ४ षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले आणि विजयाचे दरवाजे सताड उघडे केले होते.
उद्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेक महत्वाची भूमिका निभावणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com