“मृदगंध” पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण

मुंबई : विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह तसेच २०२० आणि २०२१ सालचे संयुक्तिक मृदगंध पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हे यंदाच्या स्मृती संगीत समारोहाचे खास आकर्षण ठरले. करोनामुळे सक्तीच्या लाभलेल्या सुट्टीच्या दिड वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर गायक आणि रसिक प्रथमच सामोरे आले होते. नाट्यपदं, चिजा, दोहे असे पाठोपाठ गात असताना प्रेक्षकांना स्वतःसाेबत गाण्याची संधी महेश काळे यांनी दिली. स्मृती संगीत समारोहाच्या ह्या सत्राची सांगता कानडा राजा पंढरीचा या अभंगाने होत असताना रसिकांचे डोळे, कान आणि मन तृप्त झाले होते. महेश काळे आणि त्यांना साथसंगत करणार्‍या वाद्यवृंद कलाकरांचा ह्रद्य सन्मान नंदेश विठ्ठल उमप यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. समीरा गुजर जोशी यांनी सोहळ्याचे समयसूचक सूत्रसंचालन केले. सर्व पुरस्कार्थींच्या मानपत्रांचे वाचनही त्यांनी त्यांच्या खास पद्घतीने केले. त्यामुळे सभागृहात असलेल्या सर्वांसोबतच पुरस्कार्थीही दाद देत होते. या मानपत्रांचं सुंदर शब्दांकन आनंद खासबागदार यांनी केले.


दुसर्‍या सत्राची सुरूवात सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचा सन्मान नंदेश विठ्ठल उमप यांच्या हस्ते करून झाली. त्यानंतर दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते २०२० च्या पुरस्कार मूर्ती माया जाधव यांना जीवन गौरव, प्रेमानंद गज्वी यांना लेखक व साहित्यिक, अशोक वायंगणकर यांना सामाजिक क्षेत्र, प्राजक्ता कोळी ह्यांना नवोन्मेष प्रतिभा असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्राजक्ता कोळी यांच्या मातोश्रींनी सदर पुरस्कार स्वीकारला. प्रशांत दामले यांनाही अभिनेता व निर्माता ह्या क्षेत्रातला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, परंतु कार्यबाहुल्यामुळे त्यांना समारोहास उपस्थित रहाता आले नाही.
जीवन गौरव पुरस्कारप्राप्त केल्यानंतर माया जाधव यांनी आपल्या मनोगतातून आपल्या आईवडीलांचे, नवर्‍याचे आणि संपूर्ण कुटुंबाचे ऋण व्यक्त केले. हा पुरस्कार म्हणजे साक्षात विठ्ठलाने दिलेलाच प्रसाद आहे. शाहिरी लोककला जिवंत ठेवण्यासाठीच्या नंदेश आणि सरिता उमप यांनी सुरू ठेवलेल्या ह्या समारोहाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.


तद्नंतर २०२१ चे पुरस्कार मूर्ती जयंत सावरकर यांना जीवन गौरव, डॉ. विजया वाड यांना साहित्यिक व लेखिका, उत्तरा केळकर यांना संगीत क्षेत्र, सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना लोककला, ओम राऊत यांना नवोन्मेष प्रतिभा असे पुरस्कार देण्यात आले. डॉ. विजया वाड यांचा पुरस्कार त्यांची कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका निशिगंधा वाड यांनी स्वीकारला. राजेश टोपे (आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, परंतु कार्यबाहुल्यामुळे त्यांना समारोहास उपस्थित रहाता आले नाही.
आपल्या गायकीच्या कारकिर्दीची पन्नाशी गाठत असणार्‍या उत्तरा केळकर यांनी खोप्यामध्ये खोपा हे गीत सादर केलं आणि सभागृहाने त्यांच्या सुरामध्ये आपला ताल मिसळला. जीवन गौरव पुरस्कारप्राप्त केल्यानंतर जयंत सावरकर यांनी सहा दशकं काही क्षणांत रसिकांसमोर उलगडले. त्यांच्यातला विनोदी कलाकार सभागृहातल्या सर्वांना आनंद देत होता.
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाची सांगता प्रबोधनात्मक भजनाने श्री सत्यपाल महाराज यांनी केली. साधारण अर्धा तास झालेल्या ह्या प्रबोधनात्मक भजनात चैतन्य जागवण्याची किमया सत्यपाल महाराजांनी केली.
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कारास युनियन बँकेने सहकार्य केले. पुरस्काराचे शिस्तबद्घ आयोजन सुप्रसिद्ध गायक, शाहिर तसेच विठ्ठल उमप फाऊंडेशनचे सर्वेसर्वा नंदेश विठ्ठल उमप, सरिता नंदेश उमप आणि कुटुंबीय तसेच सहकार्‍यांनी अगदी लिलया केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com