मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

आजचा दिवस क्रांतीकारी आहे. काहीवेळा आपण शब्द वापरतो पण त्याला तसा ठोस अर्थ असतोच असं नाही. पण, आज मी योग्य अर्थाने हा शब्द वापरतो आहे की आजचा दिवस क्रांतीकारी आहे आणि याबद्दल याबद्दल कोणाचंही दूमत नसेल.

आजचा हा लसीकरणाचा कार्यक्रम म्हणजे एक क्रांतीकारक पाऊल. हेच ठिकाण जुन-जुलैर्पंत तुडुंब होतं, पावसाने नाही तर कोरोनाच्या रुग्णांनी. पुढे काय होणार, इथे काम करताना आपलं काय होणार याचा विचार न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांचे जीव वाचवणाऱ्या कोविड योद्धांना मानाचा मुजरा!

महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं मी मुंबईचे रक्षक म्हणून अभिनंदन करतो. इथे उपस्थित डॉ. शशांक जोशी साहेब, राहुल पंडित साहेब, प्रदिप व्यास साहेब हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे खांब आहेत.

आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो, दिवसरात्र तणाव होता. हातात काहीच नाही मग पुढे कसं जायचं, असं वाटत होतं. पण ही सगळी मंडळी सोबत नसती तर हे ओस पडलेलं सेंटर असं पहायला मिळालं नसतं. हे असंच राहो ही प्रार्थना!

जगभरात सगळीकडे अशीच स्थिती होती, हॉस्पिटल पुरत नव्हती. युद्धकालीन परिस्थितीसारखं आपण १५ दिवसांत हे सेंटर उभारलं आणि इथून सुरुवात केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी तसेच राज्यभरात आपण अशी सेंटर्स उभारली. या सेंटर्सचा मोठा आधार आपल्याला लाभला.

आजचा दिवस हा एक क्रांती घडवणारा दिवस आहे. आपण खूप दिवसांपासून ऐकतोय लस येणार येणार, पण येत नव्हती. आज आपल्या हातात लस आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीने या लसीकरणाची आज सुरुवात होतेय. पण, आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. तोवर सर्व सूचनांचं कोटेकोर पालन करा.

अजूनही संकट टळलेलं नाही आहे. कारण अनेकदा असं वाटू शकतं किंवा बहुतेक जणांचा असा भ्रम होऊ शकतो की आता लस आलेली आहे. लशीची आता सुरुवात होत आहे, सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहे. या लसीचा प्रभाव किती काळ राहणार आहे ते एकेक दिवस गेल्यानंतर कळणार आहे.

लस तर आलेली आहे, पण सर्वात उत्तम लस ही आपल्या तोंडावर असलेला मास्क हीच आहे. मास्क घालणं हे सोडायचं नाही. मी तर म्हणेन की लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावाच लागेल. आतापर्यंत आपण या संकटाचा मुकाबला तीन सूत्रांनीच केला आहे; मास्क घाला, हात धुवा आणि अंतर ठेवा!

जर या तीन सूत्रांचा आपल्याला विसर पडला तर हे संकट जसं काही देशांमध्ये दुप्पट, तिप्पट वेगाने आलेलं आहे तसंच ते कुठेही येऊ शकतं. मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की, कोविड केअर सेंटर असंच रिकामं पडलेलं राहू दे. काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं असतं.

आजपासून सुरुवात तर झालेली आहे. पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. कोरोनाचा शेवट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ज्या काही सूचना आम्ही वेळोवेळी देत आहोत त्यांचा अगदी काटेकोरपणे आपण पालन करावं, आपण त्या सूचना पाळाव्यात एवढीच मी विनंती करतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com