मुंबई : अभ्युदय नगर येथील कामगार कल्याण केंद्र अखेर आज पाडलं गेलं. अभ्युदय नगरची ओळख असलेली ही वास्तू ललित कला भवन म्हणूनही पंचक्रोशीत प्रसिद्ध होती.
नजिकच्या काळात बरेच वर्ष ही वास्तू निवडणूक आयोगाच्या ताब्यात होती, त्यामुळे कामगार वर्गाला इथल्या सोयीसुविधांचा लाभ घेता येत नव्हता. विभागातल्या कामगारांच्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी देखील हे केंद्र उपलब्ध करून दिले जात नव्हते. केंद्राच्या दुरुस्तीकरिता योग्य ते प्रयत्न केले असते तर ही वास्तू अतिधोकादायक परिस्थितीमध्ये गेली नसती. ह्या वास्तूला लागूनच शहीद भगतसिंग मैदान आहे. इथे दिवसभर मुलं खेळत असतात. आरोग्याची काळजी घेणारे नागरिक सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी तसेच योगा आणि व्यायामासाठी ह्या मैदानाचा वापर करतात. एखादी दुर्घटना होऊ नये ह्यासाठी सदर वास्तू आज पाडण्यात आली.
कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना येथे राबविण्यात येत होत्या. शिशुमंदिर, पाळणाघर, शिवणवर्ग (सरकारमान्य / मंडळाचा), हस्तकला वर्ग, फॅशन डिझायनिंग वर्ग, ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण अभ्यासक्रम, संगणक प्रशिक्षण वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, कराटे प्रशिक्षण, योगावर्ग, टेबल टेनिस, कराटे प्रशिक्षण वर्ग, संगीत वर्ग, नृत्य वर्ग, ब्युटीपार्लर वर्ग असे विविध उपक्रम स्थानिक कामगारांच्या मागणी, जागेची व तज्ज्ञांची उपलब्धता यानुसार उपक्रम केंद्रात राबविले जात होते. लवकरच ही वास्तू नव्या रंगरूपासह कामगारांच्या सेवेत पुन्हा रुजू करावी अशी अभ्युदय नगरच्या कामगार वर्गाची मागणी आहे.