मुंबई : मुंबई शहर येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे अभय चव्हाण यांना मुंबई शहर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे मुख्यालयात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या उदय पवार यांना सहायक संचालक (मुख्यालय) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याच्या क्रीडा विभागात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या १३ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी तर एका तालुका क्रीडा अधिकाऱ्यास सहायक संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील तालुका क्रीडा अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या १४ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील खेड येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेश बागुल यांना नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे तालुका क्रीडा अधिकारी कार्यरत असणाऱ्या लता ठोसरे यांना वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे तालुका क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांना पालघर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे कार्यरत असलेल्या तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांना भंडारा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पल्लवी धात्रक यांना नागपूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. पुणे मुख्यालयात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्या शिरस यांना सिंधुदुर्ग येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना लातूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सुहासिनी देशमुख यांना बीड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रशांत दोंदल यांची गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मीरा रायबान यांना उस्मानाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबई उपनगरमधील अंधेरी येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या वर्षा शिंदे यांना अमरावती येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे गणेश कुलकर्णी यांना अकोला येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांस पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्याकरिता तत्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी करावी. तसेच संबंधित अधिकारी यांनी पदोन्नती आदेश निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पदोन्नतीच्या पदावर रुजू व्हावे असे पत्रात म्हटले आहे.